Tuesday 13 October 2015

नवदुर्गा १: शरयू


शरयू मुळची कोकणातली. दापोली तालुक्यातील आंजर्ले नावाच्या गावात ती वाढली. साधं मध्यमवर्गीय कुटुंब होतं तिचं. वडील दापोलीच्या शाळेत शिक्षक होते, आई गृहिणी. घरात आजी-आजोबा, एक अविवाहित काका, आणि शरयूची धाकटी बहिण शलाका, असे सगळे होते. खाडीच्या काठावरच टुमदार घर होतं त्यांचं. चौसोपी. घराच्या पुढ्यात अंगण, फुलझाडं, विहीर आणि घराच्या मागच्या बाजूला पोफळीची बाग. निसर्गाच्या सानिध्यात आणि अत्यंत साधेपणात शरयूचं बालपण गेलं.

शरयू लहान असल्यापासूनच अगदी तल्लख, हुशार. शाळेत नेहेमी पहिला नंबर काढत असे. त्यामुळे आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक सगळ्यांचीच लाडकी. सर्वांच्या खूप अपेक्षा होत्या तिच्याकडून. दहावी आणि बारावीत ती बोर्डात आली. आणि म्हणूनच तिला पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठवावे, असा निर्णय तिच्या आई-वडिलांनी घेतला. तिने डॉक्टर व्हावे अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती. मात्र कुणाच्याच आग्रहाला न जुमानता शरयूने 'आर्ट्स' ला जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील रुईया महाविद्यालयात तिने BA साठी प्रवेश घेतला.

मुंबईत शिक्षण घेण्यासाठी होस्टेलमध्ये राहणे अपरिहार्य होते. गावातून उठून अचानक शहरात गेलेली शरयू, तिचं कसं होईल, म्हणून आईला फार काळजी होती. आईची बालमैत्रीण मनीषा मुंबईतच राहत होती. त्यामुळे आईने मनीषाला फोन करून तिला आपल्या मुलीची काळजी घेण्याचे सांगून ठेवले. शरयूलाही मनीषा मावशीच्या रूपाने मुंबईत एक हक्काचे घर मिळाले. ती सुट्टीच्या दिवशी मनीषा मावशीच्या घरी जात असे. लवकरच ती त्यांच्या घरात छान मिसळून गेली. मनीषाची मुलं स्नेहा आणि सागरशी पण तिची मस्त गट्टी जमली.

रुईया महाविद्यालयात शरयूचं व्यक्तिमत्व सर्वांगाने फुलत गेलं. अभ्यासात तर ती पुढे होतीच. पण त्याच बरोबर निबंध-लेखन, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद ह्यातही ती चमकत होती. कॉलेजतर्फे अनेक स्पर्धांतून भाग घेऊन तिने खूप बक्षिसांची लयलूट केली. तिने मराठी साहित्य ह्या विषयात BA पूर्ण केलं. त्यावर्षीचं मराठीतील गोल्ड मेडलही तिने पटकावलं. पुढे मुंबई विद्यापीठातून तिने MA पूर्ण केलं. 

MA नंतर नक्की कुठले क्षेत्र निवडावे, ह्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. कुणी तिला पत्रकार होण्याचा सल्ला दिला, कुणी PhD करून प्राध्यापिका होण्याचा, तर कुणी निवेदिका होण्याचा. मात्र ह्यावेळीही शरयू ठाम होती. तिचे स्वप्न तिच्या वडिलांप्रमाणे शाळेत शिक्षक व्हायचे होते. पुन्हा एकदा सगळ्यांचा विरोध मोडीत काढत तिने मुंबईतच B.Ed ला प्रवेश घेतला. २ वर्षात यशस्वीपणे B.Ed पार पाडले.

शरयू B.Ed करत असतानाच तिच्या आईला शरयूच्या लग्नाचे वेध लागले. तिने स्थळं पाहायला सुरुवात केली. मनीषा मावशीच्याही कानावर घालून ठेवलं. त्याचवेळी योगायोगाने मनीषाही तिच्या मुलासाठी म्हणजेच सागरसाठी मुली पाहत होती. सागर MBBS-MD पूर्ण करून मुंबईत स्वतःची 'प्रक्टिस' करत होता. हुशार, स्मार्ट असलेल्या सागरला शरयू साजेशीच होती. त्यामुळे सागर आणि शरयूचं लग्न व्हावं, असं मनीषाच्या मनात आलं. तिने सागरला विचारलं. सागरलाही मनातून शरयू खूप आवडत होती. त्यामुळे त्याने लगेच तयारी दर्शवली.

सागराशी लग्नाचा प्रस्ताव आईने शरयूला सांगितला. शरयूलाही सागर आवडत होता. तरीही लग्नासाठी तिच्या काही अटी होत्या. तिने सागरला प्रत्यक्ष भेटून त्याच्याशी बोलण्याचं ठरवलं.

ठरल्याप्रमाणे दोघं CCD मध्ये भेटले. आणि गरम कॉफीचे घुटके घेत भविष्याविषयी बोलू लागले. शरयूने सागरला होकार दिला. म्हणजेच तिला तो आवडतो, त्याच्याशी लग्न करण्याची तयारी आहे, असं सांगितलं. मात्र त्या होकारापुढे एक जटील "अट" घालून ठेवली. ती म्हणाली,
"तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर घरजावई म्हणून आमच्या आंजर्ल्याच्या घरी येउन राहावं लागेल. तसं झालं तरच मी तुझ्याशी लग्न करेन. मला तिथल्या शाळेत नोकरी मिळाली आहे. आणि मी काही दिवसातच परत गावी जाऊन शाळेत रुजू होणार आहे."

सागरने आणि इतर सर्वांनीच तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. सागरची मेडिकल प्रक्टिस मुंबईत होती. त्याचा आता चांगला जम बसला होता. ती सोडून त्याने गावाला जाणं शक्य नव्हतं. शिवाय तो लहानपणीपासून मुंबईत राहिलेला, त्याला गावाची काहीच ओढ नव्हती. ह्याउलट शरयू गेली अनेक वर्ष मुंबईत राहिलेली. तिला शिक्षणाच्या जोरावर मुंबईत सहज नोकरीही मिळाली असती. तरीही तिला गावाला का जायचं होतं, हे कुणालाच कळत नव्हतं. 

शरयू तशी लहानपणीपासूनच हट्टी. तिने आत्तापर्यंतचे सगळे निर्णय स्वतः घेतले. सर्वांचा विरोध झुगारून देऊन घेतले. तसेच ती ह्यावेळीही वागली. कुणाचेच ऐकले नाही. सागरच्या समजावण्याचाही तिच्यावर काही परिणाम झाला नाही. तिने फार वाद नाही घातला. पण त्याला एक पत्र लिहून स्वतःची भूमिका तिने मांडली.

गावात शिक्षिका होण्याचं तिचं लहानपणी पासूनचं स्वप्न होतं. आंजर्ला गावी ७वी पर्यंतचीच शाळा होती. त्यापुढील शिक्षण घ्यायला मुलांना रोज तालुक्याला जावं लागे. जी शाळा होती, तिची अवस्थाही फारशी चांगली नव्हती. त्यामुळे उच्चशिक्षण घेऊन परत ह्याच शाळेत नोकरीला यायचं, आणि येथील शिक्षणाचा दर्जा सुधारायचा, असं तिने मनोमन ठरवलं होतं.

लवकरच शरयू गावी परतली. गावाच्या वातावरणाशी परत जुळवून घ्यायला तिला वेळ लागला नाही. कारण गावचे प्रेम, ओढ तिच्या मनात कायमच होती. गावातील शाळेत ती रुजू झाली. मन लावून मुलांना शिकवू लागली. स्वप्नपूर्तीच्या आनंदाने तिला अधिकच हुरूप येऊ लागला. ती लवकरच विद्यार्थीप्रिय शिक्षिका झाली. मुलांना तिच्या विषयात रुची वाटायला लागली. शाळेच्या वाचनालयाचं काम तिने हाती घेतलं. स्वतःची अनेक पुस्तकं देऊ केली, इतरांकडूनही पुस्तकरूपी देणगी मागायला सुरुवात केली. लवकरच एक सुसज्ज वाचनालय तयार केलं. मुलांना वाचनाची गोडी लावली. 

शरयू आपल्या कामात इतकी दंग झाली, की दुसरा कुठलाही विषय तिच्या मनात येत नसे. इथे सागरची मात्र झोप उडाली होती. शरयूचा विचार त्याच्या मनातून जात नव्हता. मन दोलायमान होत होतं. पण शेवटी शरयूच्या प्रेमाने त्याच्या  मनावर विजय मिळवलाच. एके रात्री २ वाजता तो उठला, आणि त्याने त्याचा 'तो' निर्णय आईला सांगितला..!!! 

गावच्या घराच्या अंगणातच मांडव घालून दोघांचा छोटेखानी विवाह सोहळा पार पडला. आणि सागरने 'घरजावई' म्हणून गृह-प्रवेश केला.

शरयूचे स्वप्न आणि तिला मिळालेली सागरची साथ ह्याचा सुरेख मिलाप झाला. सागरचा दवाखाना गावात तेजीत चालू लागला. त्याची कीर्ती ऐकून पंचक्रोशीतून लोक त्याच्याकडे येऊ लागले. शाळेची प्रगतीही जोरात सुरु होती. काही वर्षातच गावात माध्यमिक शाळाही सुरु झाली.

दोघांनी मिळून घेतलेला 'तो' निर्णय, गावात केलेलं 'ते' अविरत कार्य, आणि त्यातून पूर्ण होत गेलेलं 'ती'चं स्वप्न.. सगळंच असामान्य.

सामन्यातील 'ती'च्या असामान्यत्वाला सलाम..!!!


1 comment:

  1. Lekh chhan lihilas,sharayu sathi salaam......samajadari ani patience mahatvacha asato mhanaje kaam purn hote

    ReplyDelete