Tuesday 3 December 2013

सुश्मिता



मला आजही तो दिवस खूप छान आठवतो. JNU मधील आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी सुश्मिताच्या पार्टीला गेलो होतो. आमच्या वर्गाची प्रथाच होती अशी. कुणाच्याही आयुष्यातला कुठलाही आनंदाचा क्षण आम्ही ११ जण मिळून एकत्र साजरा करत असु. मग कुणाचा वाढदिवस, कुणाचा साखरपुडा, कुणाची एखादी परीक्षा पास झाल्याची पार्टी, एवढेच नाही तर कुणाच्या घरात कुणाला भाचा, पुतण्या वगरे झाला अशा अनेक प्रसंगी आम्ही ११ जणांनी पार्टी केली होती. पण ह्या पार्टीला विशेष महत्त्व होतं. आमच्या ग्रुप मधील सुश्मिताला आमच्यामध्ये सगळ्यात पहिली नोकरी लागली होती. तिच्या त्या आनंदात सहभागी होताना मलाही अतिशय आनंद होत होता.

खरं सांगायचं तर सुश्मिता जेव्हा आमच्या वर्गात M.Phil करण्यासाठी दाखल झाली, तेव्हाच हे निश्चित झालं की ती लवकरात लवकर खूप चांगली नोकरी मिळवणार. आम्ही सगळे JNU मध्ये वेगवेगळ्या उद्देशाने आलो होतो. कुणाला राजकारणात सक्रिय व्हायचं होतं, कुणाला शुद्ध संशोधन करायचं होतं, कुणाला IAS च्या परीक्षेची तयारी करायची होती. पण सुश्मिता मात्र विद्यापीठात शिक्षिकेची नोकरी मिळवण्याच्या उद्देशानेच JNU मध्ये आली. मी आयुष्यात फार कमी व्यक्ती अशा पाहिल्या आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्याकडून काय हवं ते निश्चित माहित असतं. बाकी सगळे भटकत असतात. वाट शोधत असतात. सुश्मिताला तिची वाट नक्की माहित होती. तिच्या त्या वाटेवर JNU हा केवळ एक थांबा होता. त्याच थांब्यावर ती पळभर विसावली तेव्हाच आमची मैत्री झाली. 

सुश्मिता मुळात बंगाली होती. पण तिच्या काही पिढ्या ओडिशा मध्ये स्थायिक झाल्या असल्यामुळे तिच्या कुटुंबाची ओळख ओडियाच आहे. सुश्मितालाही स्वताला बंगाली म्हणण्यापेक्षा ओडिया म्हटलेले अधिक आवडते. मागासवर्गीय घरात जन्मलेल्या सुश्मिताने जन्मापासून गरिबीच पाहिली आहे. तिचे आई-वडील दोघेही शेतमजुरी करतात. त्यात मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनावर आपल्या तीन मुलांची तोंडं भरताना अक्षरशः त्यांचे नाकी नऊ येतात. त्यात सगळ्यात मोठी असल्याच्या नात्याने सुश्मिताने सतत तडजोडच केली आहे. लहानपणी स्वतः दोन घास कमी खाऊन धाकट्या लाडक्या भावांना भरवले आहेत.

शिष्यवृत्तीच्या सहाय्याने  आजवर सुश्मिता एवढे शिक्षण घेऊ शकली, हे जरी खरे असले तरी त्याचे अशा प्रकारे चीज करणे सगळ्यांनाच जमत नाही. आजपर्यंत मिळालेल्या शिष्यवृत्त्या, बक्षीसे ह्यातून सुश्मिताने पुस्तकांखेरीज काहीच घेतले नाही. सुश्मिताला ज्ञानाची भूक आहे.  त्यानेच तिचे पोट भरते. उत्कल विद्यापीठातून ओडिया माध्यमातून तिने MA पूर्ण केलं आणि M.Phil करण्यासाठी JNU मध्ये दाखल झाली. आमच्या वर्गामध्ये इंग्लिश कच्चं असलेली ती एकमेव विद्यार्थिनी होती. पण रोज पहाटे ५ वाजता उठून इंग्लिशची उजळणी करताना मी तिला पाहिले आहे. त्यामुळेच JNU मध्ये आल्यापासून सहा महिन्यातच ती correct इंग्लिश बोलायला लागली.

सुश्मिताचं आतापर्यंतचं आयुष्य कितीही खडतर राहिलं असलं तरी त्या आयुष्याने तिला खचवून न टाकता उलट आशावादी केले आहे, तिला जीवनाबद्दलचा एक सकारात्मक दृष्टीकोन दिला आहे. मी तिला आजवर कधीही रडताना पहिलेले नाही, की कुणावर उगीचच राग राग करताना पाहिलेले नाही. तिच्या नावाप्रमाणे तिच्या चेहेऱ्यावर सतत हसू तरळत असतं. तिच्या मोहक डोळ्यातून भूतकाळाचे अश्रू नाही तर भविष्याची स्वप्नं डोकावत असतात. 

सुश्मिता बद्दलच्या काही गोष्टी मला खूपच भावतात. होस्टेल मध्ये माझी आणि तिची खोली अगदी जवळ जवळ होती. होस्टेल मधील इतर मुलींप्रमाणे मी देखील उशिरा (म्हणजे फार नाही.. ८ वाजता..) उठत असे. पण मी जेव्हा उठायचे तेव्हा सुश्मिता अभ्यासात गर्क असे. ती भल्या पहाटेच उठायची. उठून सगळ्यात आधी स्वताची खोली झाडून-पुसून स्वच्छ करायची. मग आंघोळ इत्यादी आवरून खोलीतल्या छोट्याश्या देवघरात दिवा लावायची. आणि त्यानंतर अभ्यासाला बसायची. मी तिला breakfast साठी हाक मारायचे तेव्हा तिचा अभ्यासाचा एक अध्याय पूर्ण करून ती उठलेली असायची. हा पहाटेचा अभ्यास ती रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी चुकवायची नाही. तिला एकूणच अभ्यासाचा कंटाळाच नव्हता. तिला जे यश मिळवायचे होते त्यासाठी कितीही मेहनत घेण्याची तिची तयारी होती. 

सुश्मिताची खोली अगदी स्वच्छ, टापटीप असे. होस्टेल मधल्या इतर खोल्यांसारखी मुळीच नाही. कुठे कपडे फेकलेले नाहीत, कुठे वस्तू पडलेल्या नाहीत. पुस्तके आणि अभ्यासाचे साहित्यही व्यवस्थित ठेवलेले असायचे. सुश्मिताला अभ्यासाव्यतिरिक्त अजून एक आवड होती, ती म्हणजे स्वैपाकाची. तिच्या खोलीत एक छोटीशी induction प्लेट होती. त्यावर ती वेगवेगळे पदार्थ बनवायची. मला बोलावून बोलावून खाऊ घालायची. मी तिला चेष्टेने म्हणायचेही, "छान जोडी आहे आपली, तुला बनवायची आवड आणि मला खाण्याची.." पण खरोखर सुश्मिताच्या हाताला विलक्षण चव होती. तिने केलेली साधी maggi सुद्धा चमचमीत लागायची. खूप खाऊ घातलं मला सुश्मिताने. आणि खूप काही शिकवलंही. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन तिने शिकवला, स्वप्नं पाहणं शिकवलं, आणि त्या स्वप्नांचा पाठपुरावा करणंही शिकवलं..!

सुश्मिताचा तिच्या लहान भावांवर विलक्षण जीव होता. त्यांची खरी नावं मला माहित नाहीत. ती त्या दोघांचा उल्लेख सोनू आणि चिंटू असा करायची. त्यातील सोनू त्यावेळी १२वीत होता आणि चिंटू शाळेत होता. scholarship मिळायला लागल्यापासून त्या दोघांच्या शिक्षणासाठी तीच पैसे पाठवू लागली. स्वतः ती ४-५ ड्रेस वर वर्ष काढायची पण भावांच्या शिक्षणात काही कमी पडू नये ह्यासाठी झटायची. घरच्यांशी रोज बोलता यावं म्हणून तिनेच आईला मोबाईल घेऊन दिला होता. रोज अर्धा अर्धा तास घरच्यांशी गप्पा मारायची. ती ओडिया मध्ये काय बोलायची मला फारसे कळायचे नाही, पण बहुतेकदा भावांना अभ्यास करण्याविषयी बजावत असे. भाऊ पण तिला खूप मानायचे.

एकदा सुश्मिताने आई आणि भावांना ४ दिवस दिल्ली फिरवायला आणले होते. आई सुश्मिताच्या होस्टेलच्या खोलीत राहिली होती आणि सोनू आणि चिंटू boys होस्टेल मध्ये आमच्या मित्राच्या खोलीत राहिले होते. त्यांना सुश्मिताने (आणि बरोबर मी) अगदी गाडी करून फिरवले. लाल किल्ला, लोटस टेम्पल, कुतुब मिनार सगळे दाखवले. अगदी छान हॉटेलमध्ये खाऊ घातले. त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहून माझे डोळे पाणावले होते. आयुष्यात स्वतःच्या गावाबाहेरही न पडलेले ते भाऊ सगळीकडे कुतूहलाने पाहत होते. ज्यांच्या पानात २ वेळेच्या भाताच्या पेजेशिवाय काही पडले नाही, त्या दोघा भावांनी ते मनचुरिअन, चाउमीन, इ. चाटूनपुसून खाल्ले. आयुष्यभर हालाखीत राहिलेल्या त्या माउलीने मुलांची हौस म्हणून स्वतःलाही सगळ्यात सहभागी करून घेतले. आणि आपल्या कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवण्याची स्वप्न पाहणाऱ्या सुश्मिताला ते दिवस जवळ येत आहेत असे वाटू लागले..! 

आज सुश्मिता उत्कल विद्यापीठात राज्यशास्त्राची प्राध्यापिका झाली आहे. विद्यापीठाच्या ठिकाणी एकटी घर घेऊन राहत आहे. स्वतःचे घर, स्वतःचे जेवण-खाण एकटी सांभाळते. रोजचा डबा तयार करून कॉलेजला जाते आणि वर्गात ८ च्या लेक्चरला उभी राहते. संध्याकाळी घरी आली की दुसऱ्या दिवशीच्या लेक्चरची तयारी करते. खूप मन लावून शिकवते ती मुलांना. ती विद्यार्थी-प्रिय शिक्षिका असेलच, ह्यात मला शंका वाटत नाही. तिच्या कृपेने आज तिचा सोनू कोलकाता येथे इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. आणि चिंटू १२वीचा अभ्यास करत आहे.

सुश्मिताने पाहिलेली सगळी स्वप्नं पूर्ण होऊ लागली आहेत आणि तिच्या चेहेऱ्यावरचे सु'स्मित' अजूनही तसेच खळखळत आहे..!

Saturday 30 November 2013

वासंती मामी




माझी आणि वासंती मामीची पहिली भेट माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला झाली. तसं पाहिलं तर ती माझ्या त्या मैत्रिणीची मामी. पण माझी-तिची ओळख झाल्यापासून मला ती माझीही मामीच वाटते. मामी ह्या शब्दामध्ये जो गोडवा आहे तो तिच्यात पुरेपूर भरून आहे. गोरापान रंग, हसतमुख चेहेरा, प्रसन्न व्यक्तिमत्व. कपाळाला लाल कुंकू, सुबकपणे नेसलेली कॉटनची साडी आणि वेणीत कुठलं न कुठलं फुल खोवलेलं.


वासंती मामी मूळची कोकणातल्या राजापूरची. तिचं बालपण, शिक्षण सगळं राजापुरातच झालं. ती मुंबईला आली ती थेट लग्न झाल्यावरच. कोकणातील साध्या वातावरणातून आलेली, खूप भावंड असलेल्या मोठ्या घरातून आलेली, आणि मुंबईबद्दल अप्रूप आणि भय दोन्ही मनात घेऊन आलेली. सुरुवातीला तर ती खूपच बावचळून गेली. लहान घर होतं. घरात दुसरं बाईमाणूस नाही. सासरे, नवरा, दीर असे तिघे पुरुषच होते, त्यांच्या प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळ्या, सवयी वेगळ्या, आवडी-निवडी वेगळ्या. हळूहळू वसवला संसार. आणि अनेक वर्ष नेटाने पुढे चालवला. सगळ्यांचं हवं नको पाहिलं, सगळ्यांना आपलंसं केलं.

फक्त नवऱ्याच्या पगारावर मुंबईतील घर चालवणं, मुलांना वाढवणं  अवघड आहे, हे तिने चतुरपणे हेरलं. आणि तिच्या बुद्धीला पटतील, रुचतील असे उद्योग चालू केले. त्या लहानश्या घरात पाळणाघर सुरु केलं, आजूबाजूच्या गरजू लोकांना पोळी-भाजीचे डबे देणं चालू केलं आणि सण-समारंभ प्रसंगी पुरणपोळ्या, मोदक, गुळाच्या पोळ्या, ई. च्या ऑर्डर घेणं सुरु केलं. आज वासंती मामीच्या घरात अगदी ३ महिन्यापासून ७-८ वर्षापर्यंतची मुलं सांभाळायला असतात. रोज ८-१० घरी तिने केलेली पोळी-भाजी जाते. आणि सणावारी २००-३०० पुरणपोळ्यांची ऑर्डर पुरवली जाते. खूप कष्ट करते वासंती मामी. 

पण मामीच खरं कर्तृत्व त्या कष्टांमध्ये नाहीच आहे. असे कष्ट करणारे समाजात अनेक आहेत. पण ह्या सगळ्यात जीव ओतणारे कमी आहेत. तिच्या पाळणाघरातील प्रत्येक  मुलाला ती इतका जीव लावते कि त्याला 'मामी' हि आपल्या आईच्याच बरोबरीची वाटते. मुलांना केवळ सांभाळणे, खाऊ-पिऊ घालणे, ह्यात तिची इतिकर्तव्यता नसते. तर त्या मुलावर योग्य संस्कार व्हावेत आणि त्या मुलाने जगात बाहेर पडताना एक चांगलं माणूस बनून बाहेर पडावे ह्यासाठी ती झटत असते. मुलांना आपल्या संस्कृतीशी ओळख करून देणे, त्यांना श्लोक, गाणी शिकवणे, हे सगळं ती सहज जाता जाता करते. मुलांचे वाढदिवस पाळणाघरात साजरे करणे , त्यांना सहलीला घेऊन जाणे, कधीतरी छानसा सिनेमा दाखवणे, त्यांच्यात स्पर्धा ठेवणे, बक्षिसे देणे, कधीतरी पावभाजी, भेळ करून सगळ्यांना भरवणे.. कित्ती कित्ती म्हणून करते. तिच्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलाला मामीचे घर म्हणजे आपलेच घर वाटते. 

मामीचे दुसरे कौतुक म्हणजे एवढे कष्ट करूनही ती नेहेमी हसतमुख असते. तिचं घर आल्या-गेल्याचं आहे. नणंदा-जावा, भाचरं, भावंड, मित्र परिवार  सतत येत-जात असतात. अनेकदा तर मुक्कामालाही असतात. पण घरात कितीही पाहुणे येवोत, कधी तिच्या कपाळावर आठी नसते. सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालणं हाच तिचा छंद आहे, हेच तिचं ध्येय आहे आणि हेच तिचं आयुष्य आहे. 

वासंती मामीच्या वेणीत नेहेमी कुठलं न कुठलं फुल असतं. तिला फुलांचा अतिशय नाद आहे. मामीला तिच्या केसातील फुलाबद्दल विचारावं तर ती त्याचं लांबलचक वर्णन करून सांगते. ते फुल कसलं, त्याचं नाव काय, त्याला किती सुंदर वास येतो, त्या जातीत अजून कुठले रंग होतात, इथपासून कोकणात त्या फुलांचे किती ताटवे फुललेले असत, इथपर्यंत.

फुलांच्या विश्वात रमणारी वासंती मामी स्वताही एका फुलासारखीच आहे. सुंदर, सुगंधी, सुरंगी! सगळ्यांना आनंद देणारी..!