Saturday 30 November 2013

वासंती मामी




माझी आणि वासंती मामीची पहिली भेट माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला झाली. तसं पाहिलं तर ती माझ्या त्या मैत्रिणीची मामी. पण माझी-तिची ओळख झाल्यापासून मला ती माझीही मामीच वाटते. मामी ह्या शब्दामध्ये जो गोडवा आहे तो तिच्यात पुरेपूर भरून आहे. गोरापान रंग, हसतमुख चेहेरा, प्रसन्न व्यक्तिमत्व. कपाळाला लाल कुंकू, सुबकपणे नेसलेली कॉटनची साडी आणि वेणीत कुठलं न कुठलं फुल खोवलेलं.


वासंती मामी मूळची कोकणातल्या राजापूरची. तिचं बालपण, शिक्षण सगळं राजापुरातच झालं. ती मुंबईला आली ती थेट लग्न झाल्यावरच. कोकणातील साध्या वातावरणातून आलेली, खूप भावंड असलेल्या मोठ्या घरातून आलेली, आणि मुंबईबद्दल अप्रूप आणि भय दोन्ही मनात घेऊन आलेली. सुरुवातीला तर ती खूपच बावचळून गेली. लहान घर होतं. घरात दुसरं बाईमाणूस नाही. सासरे, नवरा, दीर असे तिघे पुरुषच होते, त्यांच्या प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळ्या, सवयी वेगळ्या, आवडी-निवडी वेगळ्या. हळूहळू वसवला संसार. आणि अनेक वर्ष नेटाने पुढे चालवला. सगळ्यांचं हवं नको पाहिलं, सगळ्यांना आपलंसं केलं.

फक्त नवऱ्याच्या पगारावर मुंबईतील घर चालवणं, मुलांना वाढवणं  अवघड आहे, हे तिने चतुरपणे हेरलं. आणि तिच्या बुद्धीला पटतील, रुचतील असे उद्योग चालू केले. त्या लहानश्या घरात पाळणाघर सुरु केलं, आजूबाजूच्या गरजू लोकांना पोळी-भाजीचे डबे देणं चालू केलं आणि सण-समारंभ प्रसंगी पुरणपोळ्या, मोदक, गुळाच्या पोळ्या, ई. च्या ऑर्डर घेणं सुरु केलं. आज वासंती मामीच्या घरात अगदी ३ महिन्यापासून ७-८ वर्षापर्यंतची मुलं सांभाळायला असतात. रोज ८-१० घरी तिने केलेली पोळी-भाजी जाते. आणि सणावारी २००-३०० पुरणपोळ्यांची ऑर्डर पुरवली जाते. खूप कष्ट करते वासंती मामी. 

पण मामीच खरं कर्तृत्व त्या कष्टांमध्ये नाहीच आहे. असे कष्ट करणारे समाजात अनेक आहेत. पण ह्या सगळ्यात जीव ओतणारे कमी आहेत. तिच्या पाळणाघरातील प्रत्येक  मुलाला ती इतका जीव लावते कि त्याला 'मामी' हि आपल्या आईच्याच बरोबरीची वाटते. मुलांना केवळ सांभाळणे, खाऊ-पिऊ घालणे, ह्यात तिची इतिकर्तव्यता नसते. तर त्या मुलावर योग्य संस्कार व्हावेत आणि त्या मुलाने जगात बाहेर पडताना एक चांगलं माणूस बनून बाहेर पडावे ह्यासाठी ती झटत असते. मुलांना आपल्या संस्कृतीशी ओळख करून देणे, त्यांना श्लोक, गाणी शिकवणे, हे सगळं ती सहज जाता जाता करते. मुलांचे वाढदिवस पाळणाघरात साजरे करणे , त्यांना सहलीला घेऊन जाणे, कधीतरी छानसा सिनेमा दाखवणे, त्यांच्यात स्पर्धा ठेवणे, बक्षिसे देणे, कधीतरी पावभाजी, भेळ करून सगळ्यांना भरवणे.. कित्ती कित्ती म्हणून करते. तिच्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलाला मामीचे घर म्हणजे आपलेच घर वाटते. 

मामीचे दुसरे कौतुक म्हणजे एवढे कष्ट करूनही ती नेहेमी हसतमुख असते. तिचं घर आल्या-गेल्याचं आहे. नणंदा-जावा, भाचरं, भावंड, मित्र परिवार  सतत येत-जात असतात. अनेकदा तर मुक्कामालाही असतात. पण घरात कितीही पाहुणे येवोत, कधी तिच्या कपाळावर आठी नसते. सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालणं हाच तिचा छंद आहे, हेच तिचं ध्येय आहे आणि हेच तिचं आयुष्य आहे. 

वासंती मामीच्या वेणीत नेहेमी कुठलं न कुठलं फुल असतं. तिला फुलांचा अतिशय नाद आहे. मामीला तिच्या केसातील फुलाबद्दल विचारावं तर ती त्याचं लांबलचक वर्णन करून सांगते. ते फुल कसलं, त्याचं नाव काय, त्याला किती सुंदर वास येतो, त्या जातीत अजून कुठले रंग होतात, इथपासून कोकणात त्या फुलांचे किती ताटवे फुललेले असत, इथपर्यंत.

फुलांच्या विश्वात रमणारी वासंती मामी स्वताही एका फुलासारखीच आहे. सुंदर, सुगंधी, सुरंगी! सगळ्यांना आनंद देणारी..!