Saturday 17 October 2015

नवदुर्गा ५: शालिनी मॅडम


देव मानवीरुपात अवतार घेतो, ह्यावर माझा खरंतर विश्वास नाही. स्वतःला कुणा देवाचे 'अवतार' म्हणवून घेणारे बाबा-बुवा, ढोंगी साधू, नवरात्रीतील अष्टमीला वेड्यासारखं नाचणाऱ्या 'अंगात आलेल्या' बायका ह्यांना पाहिलं की तर मला शिसारीच येते. परन्तु देव मानवी रुपात जन्म घेत नसला तरीही माणसाला त्याच्या कर्तृत्वाने देवत्व प्राप्त होऊ शकतं, ह्यावर माझा मनोमन विश्वास आहे. माझ्या आयुष्यात मी अश्या अनेक मानवरूपी देवांना भेटले. त्यांच्याकडून खूप घेतलं. 'यथा शक्ती, यथा बुद्धी' ह्या देवांची भक्तीही केली. अशीच मला भावलेली एक देवी म्हणजे शालिनी मॅडम!

शालिनी मॅडम साक्षात सरस्वतीचा अवतार आहेत. विद्येची देवता! तेजस्वी कांती, वाणीत गोडवा आणि चेहेऱ्यावर ज्ञानाचा एक अदभूत प्रकाश! मॅडमना कधीच खूप मेकअप केलेलं वा भारी दागिने घातलेलं, भरजरी साडी नेसलेलं पाहिलं नाही मी. साधी कॉटनची साडी, गळ्यात बारीकशी चेन आणि कपाळावर बारीक टिकली, अशीच मूर्ती मी कायम पहिली आहे. पण तरीही माझ्या आयुष्यात मी त्यांच्याइतकी सुंदर स्त्री पाहिलेली नाही!

शालिनी मॅडमशी माझी भेट माझ्या BA च्या शेवटच्या वर्षाला झाली. आम्हाला 'International Politics' आणि 'American Political System' हे दोन विषय शिकवायला होत्या त्या. त्या वर्गात आल्या की वर्गात एक निराळीच शांतता पसरायची. एरवी टर्रेबाजी करणारे आणि मी मी म्हणणारेही त्यांच्या तासाला शांत बसायचे. मन लावून ऐकायचे. त्यांनी दिलेले projects, presentations, assignments सगळी मुलं वेळच्यावेळी आणि interestने पूर्ण करून आणायची. मॅडम वर्गात कधीच कुणावर रागवल्या नाहीत किंवा आरडा-ओरडा केला नाही. पण तरीही त्यांच्याबद्दल वर्गात एक वेगळाच दरारा होता. आदरयुक्त भीती होती! 

माझ्या आयुष्यात शालिनी मॅडमचे एक वेगळेच स्थान आहे. BA नंतर 'International Politics' मध्ये career करण्याचं मी ठरवलं, ते मॅडममुळेच. त्यांनी ९ वर्षांपूर्वी जे शिकवून ठेवलंय, ते आजही माझ्या मनात ठाम बसलंय. BAच्याच levelला basic concepts इतक्या पक्क्या झाल्या होत्या, की नंतर कधीच कुठे अडलं नाही. एक गंमत सांगायची म्हणजे, माझ्या MAचे काही पेपर आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाची अशी NETची परीक्षा ह्या दोन्हीसाठी मी मॅडमच्या BAला शिकवलेल्या नोट्स वापरल्या. आणि त्याचा अपेक्षित परिणामही घोषित झालाच. अशा ह्या माझ्या मॅडम!

शालिनी मॅडम मुळच्या गिरगावातल्या. चाळीतील दोन खोल्यांत वाढल्या. घरात आजी-आजोबा, आई-वडील आणि एक-एक बहिण भाऊ. मॅडमच्या घरात मुळातच शिक्षणाचं वातावरण होतं. त्यांचे वडील माध्यमिक शिक्षक होते आणि आई घरीच शिकवण्या घेत असे. त्यामुळे 'शिक्षकी' पेशाचे संस्कार त्यांच्यावर लहानपणीपासूनच झाले. मॅडमना वाचनाची भयंकर आवड. लहान वयातच त्यांनी मराठी आणि इंग्लिश मधील अनेक कथा कादंबऱ्या, ऐतिहासिक पुस्तकं, राजकारणावरील लेख, निबंध वाचून काढले होते.

देशात आणीबाणी लागली त्यावेळी मॅडमनी नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळच्या विशिष्ट वातावरणाने प्रभावित होऊनच त्यांनी 'राज्यशास्त्र' हा विषय निवडला, असं त्या हसत हसत सांगतात. पण त्याबद्दल त्यांना फार आनंद आहे, आणि त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनाही! कारण राज्यशास्त्राची प्राध्यापक हीच त्यांची ओळख आहे. त्यांनी दुसरा कुठला विषय निवडला असता तर तो राज्याशास्त्र विषयावर अन्याय झाला असता, असं मला वाटतं.

राज्यशास्त्रात MA पूर्ण करून त्यांनी मुंबई विद्यापीठातून PhD करायला सुरुवात केली. आणि त्याच दरम्यान त्यांचं लग्न झालं. संसाराच्या सुरुवातीच्या काळात मॅडमना बरंच struggle करावं लागलं. सासरची मंडळी अगदी जुन्या पद्धतीची. त्यामुळे 'सून' म्हणून घरात खूप जबाबदाऱ्या पडल्या. रोजचं स्वैपाकपाणी, सासू-सासऱ्यांचं पाहणं, दोन लहान मुलांचं करणं, हे तर होतंच. शिवाय सणवार, कुळाचार वगैरेही होतं, घरात नातेवाईकांचा राबता होता. ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड देत त्यांनी PhD पूर्ण केली. PhDच्या ४ वर्षांमध्ये अनेक कठीण प्रसंग आले. एकवेळ तर अशी आली, की PhD सोडून द्यावी असं त्यांना वाटू लागलं. पण धैर्याने आणि जिद्दीने त्यांनी त्यातून मार्ग काढला. मॅडमचे पती पत्रकार असल्यामुळे त्यांनाही मॅडमच्या कामाचं कौतुक होतं. त्यांनीही मोलाचं सहकार्य केलं.

गेली अनेक वर्ष मॅडम महाविद्यालयात शिकवत आहेत. हजारो मुलांना घडवून त्यांनी पुढचा रस्ता दाखवला आहे. आजपर्यंत मॅडमच्या मार्गदर्शनाखाली ३५ मुलांनी त्यांची PhD पूर्ण केली आहे. एवढंच नाही, तर निवड झालेल्या IAS आणि IFS अधिकार्यांना International Politics बद्दल विशेष training द्यायला मॅडमना दरवर्षी बोलावतात. आज सेवेत असलेले अनेक अधिकारी मॅडमचा आपुलकीने उल्लेख करतात. मॅडमनी शिकवलेले २ विद्यार्थी गेल्यावर्षी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. तेही विशेष राजकीय सल्लागार म्हणून मॅडमकडेच येतात, हे वेगळं सांगायला नको.

शालिनी मॅडमनी आत्तापर्यंत अनेक पुस्तकं लिहिली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मूलतः इंग्लिशमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक पुस्तकाचं त्यांनी स्वतःच मराठीत भाषांतर केलेलं आहे. भाषेच्या मर्यादेमुळे ज्ञानाच्या प्रसारावर बंधन येऊ नये, असं त्या नेहेमी म्हणतात. मॅडम अनेक देशांमध्ये जाऊन आल्या आहेत. इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे तर त्यांच्या विशेष अभ्यासाचे देश आहेत. ह्या तीनही देशांत त्या अनेक महिने वास्तव्य करून आल्या आहेत, तिथल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी विपुल लिखाण केलं आहे. 

गेल्याच आठवड्यात माझ्या मेलबॉक्स मध्ये एक मेल येऊन धडकला. युद्धोत्तर अफगाणिस्तानातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर मॅडमनी नुकतंच एक पुस्तक लिहून पूर्ण केलं आहे. त्यासाठी त्या गेल्यावर्षी ३ महिने काबुलमध्ये जाऊन राहिल्या होत्या. ह्या त्यांच्या पुस्तकाचं (इंग्लिश आणि मराठी आवृत्ती) लवकरच प्रकाशन होणार आहे. त्या प्रकाशन सोहळ्याचं निमंत्रण देणारा मेल होता तो.

शालिनी मॅडमच्या कामाचा, जिद्दीचा आणि सातत्याचा मला खूप आदर वाटतो. त्या कधीच स्वस्थ बसत नाहीत. सतत अभ्यासदौरे, व्याख्यानं, पुस्तकांचं लेखन, PhD च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, हे सगळं करत असतानाच त्यांचं सकाळी ७चं कॉलेजचं लेक्चर कधीच चुकत नाही. एवढी उर्जा, एवढा उत्साह येतो कुठून त्यांच्यात? अर्थात, ज्ञानदानाचा जो वसा त्यांनी घेतला आहे, त्यासाठी अविरत झटताहेत, तो वसाच देतो, उर्जा आणि उत्साह!

मी शालिनी मॅडमना माझ्या 'रोल मॉडेल' मानते. पण माझ्या संपूर्ण आयुष्यात त्यांच्या निम्मं काम जरी मी करू शकले, तरीही मी स्वतःला धन्य मानेन. माझ्या आयुष्यात ज्ञानरुपी दिवा लावून मला मार्ग दाखवलेल्या माझ्या गुरूला माझं मनःपूर्वक वंदन!!

Thursday 15 October 2015

नवदुर्गा ४: शाहिना रहिमोवा



'ती'ची आणि माझी पहिली भेट ताश्कंद विमानतळावरच झाली. मी पहिल्यांदाच उझ्बेकिस्तानला गेले होते. त्यामुळे मनात खूप धाकधूक होती. कसं असेल तिथलं वातावरण. असं एकटीने जायचं, त्यात मुलगी. काही प्रॉब्लेम नाही ना होणार. एक ना दोन.. अनेक शंका होत्या. घाबरतच मी विमानतळाबाहेर पडले. आणि समोरच 'ती' माझ्या नावाचा फलक घेऊन उभी होती!!


तिला पाहिल्यावर मला खूपच छान वाटलं. ती प्रसन्न हसत होती. मी ओळख सांगितल्यावर तिने मला गच्च मिठीच मारली. गालाचा मुका घेतला. आणि म्हणाली, 'welcome to our Uzbekistan!'. तिने तिची ओळख सांगितली. "I am from Academy of Sciences (त्याच संस्थेत पुढील एक महिना माझं वास्तव्य असणार होतं.) My name is Shahina Rahimova!!!" (उझ्बेकीस्तानात 'शाहिना' चा उच्चार 'शोखिना' असा करतात.)

खूपच सुंदर होती 'ती'. गोरी-पान, गुलाबी गाल, तपकिरी डोळे आणि लालसर केस. तिने काळा-पांढरा frock घातलेला, गुडघ्याएवढा. अगदी गोड दिसत होती. दिसणं जसं गोड, तसं बोलणंही लाघवी. मला विमानतळावरून receive करून माझ्या निवासाच्या ठिकाणी घेऊन जाणे आणि माझी व्यवस्था लावून देणे, ह्या कामावर तिची नेमणूक केली होती. taxi मध्ये असताना तिची अखंड बडबड सुरु होती. तिच्या बोलण्याने मीही मोकळी होऊ लागले आणि सुरु झाली एक संस्मरणीय मैत्री!

त्यानंतर महिनाभरच्या वास्तव्यात शाहिना अनेकदा माझ्याबरोबर असायची. तिने मला संपूर्ण ताश्कंद फिरवलं. वेगवेगळी museums, libraries, एवढंच नाही तर प्रेक्षणीय ठिकाणं, बागा, प्रसिद्ध मशिदी, मदसरे, ऐतिहासिक स्थळं, सगळंच दाखवलं. जुन्या ताश्कंद मध्ये (जुन्या दिल्लीसारखंच) नेऊन तिथली घरं, वस्त्या दाखवल्या. तिथल्या मोहल्ल्यांची ओळख करून दिली. बाजार फिरवले, shopping करवली आणि छान छान खाऊ गल्ल्याही दाखवल्या. एवढंच नाही, तर मला एका दिवसाची समरकंदची टूरही करून आणली. थोडक्यात काय, तर उझबेकिस्तानची माझी ट्रीप अविस्मरणीय होण्यात शाहिनाचा खूप मोठा वाटा आहे.

एकत्र फिरताना आम्ही खूप गप्पा मारल्या, अनेक विषयांवरची एकमेकींची मतं जाणून घेतली. एकमेकींच्या वैयक्तिक आयुष्यातही थोडंसं डोकावलो. आणि त्यातून मला उलगडलं शाहिनाचं अदभूत भावविश्व!!!

शाहिना मूळची समरकंदची. तिथेच ती वाढली. तिचं कुटुंब खूप मोठं. तिच्या आई-वडिलांना ७ मुली. त्यामध्ये शाहिनाचा नंबर ६वा. शाहिनाचे वडील सोविएत इस्पितळात सरकारी डॉक्टर होते. आई अंगणवाडीमध्ये काम करायची. शाहिनाचा जन्म सोविएत काळाच्या शेवटच्या दशकात झाला. तरीही तिच्या मनात सोविएत काळातील अनेक आठवणी अजून ताज्या आहेत. सोविएत काळातील सरकारी नोकर असल्यामुळे तिच्या वडिलांवर अनेक बंधनं होती, विशेषतः धर्माचरणाविषयी. शाहिना अगदी पारंपारिक वातावरणात वाढली. परंतु उझ्बेक समाजात 'पारंपारिक'चा अर्थ 'धार्मिक' असा होत नाही. धर्माचरणाने मुसलमान असूनही त्यांच्या घरात उपसनापद्धतीचं स्तोम कधीच नव्हतं. शाहिनाला घरात कधीच कुणी नमाज पढ, रोजे कर वा डोक्यावरून 'हिजाब' घे असं सांगितलं नाही. त्याबाबतीत तिला पूर्ण स्वतंत्र होतं. ती निधर्मी नाही, पण फार धार्मिकही नाही.

एकूणच उझ्बेकीस्तानात महिलांवर सामाजिक बंधनं फारशी दिसत नाहीत (भारतीय समाजाशी तुलना करता). तेथील महिला मुक्त राहतात. शिकतात, काम करतात, पैसे कमावतात. आपल्याला जसं हवं तसं आयुष्य निवडतात. कपड्यांच्या बाबतीतही काही कडक नियम नाहीत. शहरातील महिला आधुनिक कपडे घालतात. खेड्यातल्या लांब झगे घालतात आणि डोक्याला रुमाल बांधतात. महिलांवरील अत्याचार, लैंगिक शोषण आणि बलात्कारांचं प्रमाण लक्षणीयदृष्ट्या कमी आहे. महिलांना समाजात मान आहे.


शाहिना ३० वर्षांची आहे. तिच्या सगळ्या बहिणींची लग्न झाली आहेत, धाकट्या बहिणीचंही. पण तिला एवढ्यात लग्न करायचं नाही. ती ताश्कंदला एकटी राहते, भाड्याच्या घरात. पण तिच्या घरातून तिच्यावर लग्नाचा आग्रह कुणीही करत नाही. ती एवढी शिकतेय, PhD करतेय, स्वतंत्र आयुष्य जगतेय, ह्याचं तिच्या आई-वडिलांना कौतुकच आहे. शाहिना खूप independent विचारांची आहे. लग्नाविषयीच्या तिच्या कल्पनाही अगदी नेमक्या आहेत. तिला असा मुलगा हवा आहे, जो तिच्या भावना समजून घेईल, तिच्या career ला प्रोत्साहन देईल. एवढंच नाही तर ती नक्की काय करते, कुठल्या विषयावर संशोधन करतेय ह्यात रस घेऊन तिच्याशी त्या विषयावर गप्पा मारेल.


शाहिनाच्या आयुष्याबद्दलच्या कल्पना चारचौघींपेक्षा वेगळ्या आहेत. तिला सामान्य आयुष्य जगायचं नाही. आला दिवस ढकलायचा आणि उद्याची काळजी करायची, अशी तिची वृत्तीच नाही. तिला दुनिया फिरायची आहे. ती तिच्या PhDच्या शेवटच्या वर्षाला आहे. तिचे कितीतरी शोध-निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. ती संशोधनासाठी १ वर्ष पोलंडला आणि ६ महिने रशियाला जाऊन आली आहे. शिवाय कॉन्फरन्ससाठी लंडन आणि इस्तंबूललाही जाऊन आलेली आहे. अशा फिरण्यातून ह्या वयातच तिने खूप अनुभव गोळा केलेले आहेत. तिला उझ्बेक, रशियन, तुर्किश, पोलिश आणि इंग्लिश अश्या ५ भाषा अस्खलित बोलता येतात. शाहिना खूपच dynamic मुलगी आहे. तिचं व्यक्तिमत्व बिनधास्त आणि बेधडक आहे.


मोठी स्वप्न पाहताना शाहिनाचे पाय मात्र जमिनीवर आहेत. लहान सहान गोष्टींतही ती खूप रस घेते. सगळंच मन लावून करते. मला एके दिवशी तिने घरी जेवायला बोलावलं. मी हिंदू असल्यामुळे beef खात नाही, हे तिला आधीच माहित होतं. तिने त्या दिवशीच्या स्वैपाकात beefचा वापर काळजीपूर्वकरित्या टाळला. खूप टेस्टी जेवण बनवलं होतं तिने. आणि शिवाय उझ्बेक प्रथेप्रमाणे पूर्ण टेबलभर पदार्थ मांडून ठेवलेले; फळ-फळावळ, सुकामेवा, चॉकलेट्स, पेस्ट्रीज, सलाड आणि ग्रीन टी. निघताना बरोबरही डबे भरभरून दिलं. शिवाय मला ड्रेसचं कापड आणि पर्स भेट दिली. मला खूपच भरून आलं.


शाहिनाला भारताबद्दल खूपच आस्था होती. ती मला खूप विचारायची, भारतीय संस्कृती, परंपरा, लोककला, संगीत, सगळ्या बद्दलच. ती खूप हिंदी पिक्चर बघते (उझ्बेकीस्तानात 'उझ्बेक' भाषेत translate केलेले हिंदी पिक्चर खूप लागतात, TV वरही आणि theater मध्येही. ते सगळीकडेच खूप लोकप्रिय आहेत.) तिला भारतीय पोशाख, साड्या, दागिने, मेहेंदी, टिकली ह्या सगळ्याचेही खूप आकर्षण आहे. शाहिनाला ताजमहाल पाहण्यासाठी (ताजमहाल उझ्बेक राजघराण्यातील माणसाने बांधला, म्हणून उझ्बेक लोकांना त्याविषयी खूप अभिमान आहे!) आणि साड्या, ड्रेस खरेदी करण्यासाठी भारतात यायचं आहे. मीही तिला आग्रहाचं आमंत्रण दिलं आहे. पाहू ह्यापुढे कधी भेट होते.


एका महिन्याची आमची संगत मला खूप काही शिकवून गेली. मला एक जीवा-भावाची मैत्रीण देऊन गेली. शाहिनाची मला खूप आठवण येते. आत्ताच्या आत्ता ताश्कंदला जाऊन तिला घट्ट मिठी मारावीशी वाटते. तिच्याबरोबर तीच सगळी ठिकाणं परत पहावीशी वाटतात, त्याच सगळ्या गप्पा परत माराव्याश्या वाटतात!


'ती'ला, 'ती'च्या स्वप्नांना आणि 'ती'च्यातील असामान्य जिद्दीला मनापासून सलाम!!!


(Disclaimer: माझ्या उझ्बेकीस्तानातील वास्तव्यात माझ्या अनेक मैत्रिणी झाल्या. ह्या लेखात त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व 'ती' म्हणजेच 'शाहिना' करतेय. शाहिना हे कुणा एका उझ्बेक मुलीचं व्यक्तिचित्रण नाही, ते एक काल्पनिक पात्र आहे, ह्याची कृपया नोंद घ्यावी.)

नवदुर्गा ३: सुपर्णा



"ती" अजूनही थरथर कापत होती. 'ते' ऐकलं तेव्हा आधी ती स्तब्ध उभीच राहिली. शून्यात डोळे लावून एकटक बघत राहिली. हळूच डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. मध्येच जोरात हंबरडा फोडला. दबकन खाली बसली. वेड्यासारखंच करायला लागली. तिच्या ज्या मैत्रिणीने तिला 'ते' सांगितलं तीच तिची समजूत काढायला लागली. तिला सावरायला लागली. थोड्यावेळाने तिला शुद्ध आली. जे ऐकलं ते खरं आहे, ह्यावर तिचा विश्वास बसला. आणि त्यापुढे संघर्ष सुरु झाला 'ते' सत्य पचवण्याचा!!

नवऱ्याचं कुणा दुसऱ्या स्त्रीवर प्रेम आहे, हे सत्य पचवणं कुणाही स्त्रीसाठी अवघडच असतं. आणि त्यात ते वयाच्या ४८व्या वर्षी कळावं आणि तेही घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरु असताना! हा क्रूर योगायोग म्हणायचा की काय? "…आपल्याशी संसार करता-करताच आपल्या नवऱ्याने दुसऱ्या कुणावरही प्रेम केलं, आपल्याला फसवून केलं, सगळ्या जगाला अंधारात ठेवून केलं. काय ह्याचा अर्थ? आपण अगदीच मूर्ख ठरलो का? आपल्या लक्षातच आलं नाही. मुळात त्याने आपल्यावर कधीच प्रेम केलं नसेल का? आपल्याशी लग्नच का केलं असेल मग?" एक ना दोन अनेक विचारांनी तिच्या डोक्यात थैमान घातलं. 


सुपर्णा खूपच साधी सरळ होती. तिच्या आणि प्रसादच्या लग्नाला २ महिन्यांपूर्वीच २६ वर्षं पूर्ण झाली होती. ह्या २६ वर्षांत सुपर्णाने संसारासाठी सर्वस्व अर्पण केलं होतं. खरंतर घर, नवरा आणि तिची एकुलतीएक मुलगी श्वेता हेच तिचं आयुष्य होतं. त्यापलीकडे ती कधी गेलीच नाही. 

सुपर्णा आणि प्रसाद ह्यांचा प्रेमविवाह. त्या दोघांची भेट त्यांच्या एका common मैत्रिणीकडे झाली होती. प्रसाद त्यावेळी J.J. School of Art ला
Fine Arts करत होता. आणि सुपर्णा SNDT महाविद्यालयातून Home Science करत होती. तसं पाहता त्या दोघांमध्ये काहीच साम्य नव्हतं. प्रसाद कलाकार वृत्तीचा, स्वैर, रसिक. आणि सुपर्णा अगदीच सरळमार्गी. तिला शिस्त, टापटीपपणा आवडे; तर त्याला पसारा. तिला स्वैपाकाची, घर सजवण्याची आवड; तर त्याला फिरण्याची. तरीही प्रसाद तिच्या प्रेमात पडला. कदाचित त्यामुळेच पडला.

मुळात प्रसाद एका बड्या घरातला होता. पण लहानपणीपासूनच त्याचं कौटुंबिक जीवन ताणतणावाने भरलेलं होतं. त्याचे वडील जगप्रसिद्ध चित्रकार होते. पण प्रसादची आई अगदी लहानपणीच गेल्यामुळे त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. सावत्र आईजवळ वाढल्यामुळे प्रसादला प्रेम कधी मिळालंच नाही. आई-वडिलांचे वाद, वडिलांची प्रकरणं, त्यांच्या सर्वत्र चर्चा, वडिलांची दारू  ह्या सगळ्याचाच त्याच्या बालमनावर विपरीत परिणाम झालेला होता. तो कळत्या वयात आला, आणि वडिलांचेही निधन झाले. ह्या सगळ्यामुळे प्रसाद खूप एकलकोंडा झाला. त्याला ह्यातून बाहेर पडून एक सरळ साधं आयुष्य जगावंसं वाटे. म्हणूनच त्याची नजर एका संसारी, शालीन मुलीला शोधत होती. सुपर्णाच्या रूपाने त्याला 'ती' मिळाली.

त्याच्या अगदी उलट सुपर्णाची कौटुंबिक पार्श्वभूमी होती. ती चाळीच्या २ खोल्यांत वाढली. तिचे वडील सरकारी तार विभागात कर्मचारी आणि आई गृहिणी. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. पण घरात प्रेम, माया, ऊब भरपूर होती. सुपर्णा एकुलतीएक असल्याने तिच्यावर आईवडिलांचा खूप जीव. त्यांनी तिच्यावर संसार केले, तिला ऐपतीप्रमाणे शिकवलं आणि मोठं केलं. प्रसादशी लग्नाला खरंतर तिच्या आई-वडिलांचा होकार नव्हता. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि चित्रकार असल्यामुळे आर्थिक अस्थिरता अशी दोन्ही कारणं होती त्यामागे. पण तरीही मुलगा स्वभावाला चांगला आहे आणि मुलीला आवडला आहे, म्हणून त्यांनी लग्न लावून दिलं.

सुपर्णा-प्रसादच्या संसाराची सुरुवात आर्थिक हालाखीतच झाली. प्रसाद खूप उत्तम दर्जाचा चित्रकार होता. त्याचं सगळीकडे नाव होतं, मोठमोठ्या लोकांत उठबस होती. पण ह्या सगळ्याची परिणती आर्थिक भरभराटीत व्हायला वेळ लागला. त्याला सुरुवातीला खूप struggle करावं लागलं. पण सुपर्णाने कधी तक्रार केली नाही. असेल त्या परिस्थितीत दिवस काढले. छोट्या श्वेतालाही मोठ्या हुशारीनं वाढवलं, शिकवलं. आपल्या अडचणींची झळ तिच्यापर्यंत कधीच पोहोचू दिली नाही. सुपर्णाच्या अस्तित्वानेच त्या घराला 'घरपण' आलं. प्रसादला हवं होतं तसं साधं-सरळ तरीही सुखा-समाधानाचं आयुष्य तिने त्याला दिलं!!!

"इतका सुखी-समाधानी संसार केला आम्ही दोघांनी.. चांगले वाईट दिवस एकत्र जगलो, एकमेकाला आधार दिला.. तरीही असं कसं वागला प्रसाद? मी कुठे कमी पडले का? मी त्याला सुख दिलंच नाही का?…" सुपर्णाची विचारचक्र फिरतच होती. प्रसाद तिला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. तिच्या कानांवर त्याचं बोलणं आदळत होतं, मात्र मेंदूपर्यंत एकही वाक्य पोहोचत नव्हतं. खरंतर तिला पोहोचू द्यायचं नव्हतं.

प्रसादचं तिच्या जवळ असणं आणि 'त्या' गोष्टीचं समर्थन करून वर तिचीच समजूत काढणं, नकोच वाटू लागलं तिला. ती जोरात गरजली त्याच्या अंगावर, "गप्प बस. बास कर तुझं..." असं म्हणून सुस्कारा सोडला. मग शांतपणे म्हणाली, ".. श्वेताचं लग्न एका महिन्यावर आलंय. घरात खूप कामं पडलीयेत. अजून खूप तयारी व्हायचीये. त्यामुळे हा विषय बस करूया आता. श्वेताची पाठवणी होईपर्यंत काही बोलायचं नाही ह्यावर. त्यानंतर बघू."

ठरल्याप्रमाणे श्वेताचं लग्न थाटामाटात पार पडलं. सगळं दुःख पोटात घालून सुपर्णाने लग्नाची तयारी केली. चेहेऱ्यावर कायम हसू ठेवलं; इतकं की श्वेताला देखील शंका येऊ दिली नाही. लग्न करून श्वेता नवऱ्याकडे गेली. आता घरात सुपर्णा आणि प्रसाद दोघेच राहिले. खरंतर हे दिवस दोघांनी मिळून एकमेकाला सावरण्याचे आणि आयुष्य नव्याने सुरु करण्याचे असतात. ह्यालाच आपण 'सेकंड इनिंग' म्हणतो. पण सुपर्णासाठी 'सेकंड इनिंग' चा अर्थ वेगळाच ठरला!

स्वतःच स्वतःवर घातलेल्या बेड्या तिने एकदम मोकळ्या केल्या. प्रसादला घरातून निघून जायला सांगितलं. ते घर प्रसादच्या नावावर असलं तरी ते तिने कष्टाने उभं केलेलं होतं. त्यावर नैतिकदृष्ट्या तिचाच अधिकार होता. प्रसादने सुरुवातीला प्रतिवाद केला; कधी रडून, कधी ओरडून, कधी समजावून. त्याला सुपर्णाला सोडून जायचं नव्हतं. त्याचा अजूनही खूप जीव होता तिच्यावर. तिच्या मनातून मात्र तो कायमचा उतरला होता. ती त्याच्या कुठल्याच बोलण्याला बळी पडली नाही. तिने मनाशी ठाम ठरवलं होतं. एकदा घटस्फोटाचा विचारही तिच्या मनात आला. पण ह्या वयात वकील, कोर्टकचेऱ्या, counseling च्या भानगडीत कुठे पडणार. तिने टाळला तो मार्ग. तिने मनानेच त्याला घटस्फोट देऊन टाकला. शेवटी नाईलाजाने प्रसाद घर सोडून गेला.

आता सुपर्णा एकटीच होती, 'ती'च्या घरात! 'ती'ची तिलाच नव्याने ओळख करून घ्यायची होती. तिला 'ती'च्या बरोबर नव्याने आयुष्य सुरु करायचं होतं. भूतकाळ विसरून वेगळाच भविष्यकाळ घडवायचा होता!

तिने तिची जुनी पुस्तकं माळ्यावरून खाली काढली. सगळी धूळ पुसून टाकली. पुस्तकांसाठी छान नवीन जागा केली. पुन्हा नव्याने तीच पुस्तकं वाचायला सुरुवात केली. तिला परत interest येत गेला. तिने SNDT महाविद्यालयात MSc साठी प्रवेश घेतला. आणि २७ वर्षांपूर्वी सोडून दिलेलं शिक्षण पुन्हा सुरु केलं. M.Sc साठी तिने Nutrition हा विषय निवडला. M.Sc यशस्वीपणे पूर्ण केल्यावर तिने PhD साठी प्रवेश घेतला. आणि "Menopause and Nutrition" ह्या विषयावर संशोधन सुरु केलं. एका maternity home मध्ये तिने चौकशी केली. तिला special cabin आणि time slot दिला गेला. तिथे तिने स्वतःची practice सुरु केली. दरम्यान तिला पनवेलजवळील एका महिलाश्रमाविषयी माहिती मिळाली. तिने दर मंगळवारी तेथे भेट द्यायला सुरुवात केली. तेथील महिलांना आरोग्य आणि आहार ह्या विषयावर ती व्याख्याने  देऊ लागली.

प्रसाद काहीवेळा तिला फोन करे, तिला भेटायला येई. पण सुपर्णा कामात इतकी व्यस्त असे, की त्याला भेटूच शकत नसे. खरंतर त्याला भेटण्याची तिला आता गरजच नव्हती. ती त्या रस्त्यावरून खूप पुढे निघून गेली होती. परत कधीच U-turn नं घेण्यासाठी!! तिच्या 'सेकंड इंनिंग' मध्ये त्याला जागाच नव्हती!!!

Wednesday 14 October 2015

नवदुर्गा २: संगीता


संगीता तशी फारच शांत होती. हॉस्पिटलमधील कुणाशीच ती फारसं बोलत नसे. गप्पा नाहीत, हसणं- खिदळणं नाही की 'gossiping' नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं, बाकी कुणाशी देणं-घेणं नाही. कामात मात्र ती अगदी तरबेज होती. Gynecology हे तिचं 'passion' होतं. त्यात तिचं मन रमे. आपलं काम अत्यंत आवडीने आणि मन लावून करायची ती.

तिच्या कामातील कौशल्यामुळे तिच्या विभागाचा प्रमुख डॉ. प्रशांत आठवले तिच्यावर खुश होता. संगीतावर एकदा काम सोपवलं की त्याला लक्ष द्यावं लागत नसे. प्रशांत तसा होता पस्तिशीतला. पण शिक्षणाने आणि कर्तृत्वाने मोठा असल्यामुळे त्याला एवढ्या लवकरच विभागप्रमुखाचं स्थान मिळालं होतं. त्यानेच संगीताचा इंटरव्यू घेऊन तिची नेमणूक केली होती.

हळूहळू दोघांची मैत्री होऊ लागली. म्हणजे संगीता सुरुवातीला शांतच असे, फारशी बोलत नसे. प्रशांतच आपणहून पुढाकार घेऊन बोलायला जाई. कधी कामाच्या निमित्ताने, कधी घरी सोडण्याच्या निमित्ताने, कधी कॉफी प्यायला जाण्याच्या निमित्ताने. पाहता पाहता संगीताही मोकळी होऊ लागली. मनातलं बोलू लागली. एके दिवशी CCD मध्ये कॉफी पीत असताना संगीताने तिचा भयंकर भूतकाळ प्रशांतपुढे उलगडला, ज्याने तो पुरता हेलावून गेला.

संगीता मुळची उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधली. तेथील एका खेडेगावात तिचं घर होतं. तिथेच ती जन्मली, वाढली. घर खूप मोठं होतं. आणि एकत्र कुटुंब. घरात ५ भावांचे संसार, त्यांची कुटुंब, मुलंबाळं. ५ भावांमध्ये संगीताचे वडील सगळ्यात धाकटे आणि त्यांना संगीता ही एकच मुलगी. घरची आर्थिक परिस्थिती सुखवस्तू होती. पण वैचारिकदृष्ट्या बुरसटलेली. सगळ्या घराचा मिळून एक व्यवसाय होता. संगीताचे वडीलही त्याच व्यवसायात होते. लहान असल्यामुळे त्यांना घरात आणि धंद्यात मोठ्या भावांचं ऐकावंच लागे. एकाच अपत्याला आणि त्यातही
मुलीला जन्म दिल्यामुळे त्यांची सगळेच हेटाळणी करत.

कुटुंबात शिक्षणाचं वातावरणच नव्हतं. संगीताची आई, काकू कुणालाच लिहिता वाचता येत नसे. घरातील व्यवहारातही त्यांचं मत कुणी विचारत नसे. संगीताच्या मोठ्या चुलत बहिणीही जेमतेम ५-७ इयत्ता शिकल्या आणि भरमसाट 'दहेज' देऊन त्यांची लग्न करून दिली. एकूणच त्यांच्या घरात मुलींच्या शिक्षणावर बंधनं होती. लहान वयापासूनच संगीताला घरकाम शिकवलं गेलं. आणि ती १४-१५ वर्षाची असल्या पासूनच घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. 

अशा परिस्थितीत वाढणाऱ्या संगीताला मात्र शिकायचं होतं. डॉक्टर व्हायचं होतं. ती अतिशय उत्साहाने शाळेत जाई, मन लावून अभ्यास करे. फावल्या वेळातही ती काहीतरी वाचत बसे. संगीताने शिकून मोठं व्हावं
असं तिच्या वडिलांनाही वाटे. पण भावांच्या पुढे त्यांचं काहीच चालत नसे.

संगीता १२वी पास झाल्यावर तिच्यासाठी 'रिश्ते' यायला लागले. पण त्याचवेळी तिला बनारस हिंदू विद्यापीठात MBBS ला प्रवेश मिळाला. त्यामुळे तिचं शिक्षण पुढे सुरु राहावं, असा हट्ट तिच्या वडिलांनी धरला. त्यातून मध्यम तोडगा म्हणून लग्न करून देऊन मग शिक्षण सुरु ठेवावं,
असा निर्णय झाला. संगीताचं लग्न झालं तेव्हा ती १८ वर्षांची होती आणि तिचा नवरा होता २० वर्षांचा. २-३ प्रयत्नात कसाबसा १२वी पास झालेला. तो मुलगा घरचाच व्यवसाय पाहत होता. गोरखपूर मधील एका धनाढ्य कुटुंबात लग्न झालेलं तिचं. 

लग्नानंतर संगीता सासरी गेलीच नाही. ठरल्याप्रमाणे बनारसला गेली आणि डॉक्टरकीच्या शिक्षणाला सुरुवात केली. ५ वर्षात MBBS
यशस्वीपणे पार केलं. विद्यापीठात पहिली आल्यामुळे तिला MDलाही सहज प्रवेश मिळाला. MD साठी तिने Gynecology हा विषय निवडला. तिला सुरुवातीपासूनच त्या विषयात रस होता. स्त्रीला मिळालेला सृजनाचा अधिकार, तिच्या पोटी होणारी नवीन जीवाची उत्पत्ती ह्याबद्दल तिला अप्रूप वाटे. संगीताच्या MD करण्याच्या निर्णयाने तिच्या घरची आणि सासरची मंडळी अस्वस्थ होत होती. पण ह्यावेळीही संगीताच्या वडिलांनी ठाम राहून सगळ्यांना समजावलं. ह्याप्रसंगी तिच्या कॉलेजमधील प्रध्यापाकांचंही मोलाचं सहकार्य लाभलं. 

संगीताने MD चा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर मात्र तिचं काहीच चाललं नाही. एक छोटासा समारंभ करून तिची सासरी पाठवणी करण्यात आली. सासरी जगलेला एकेक दिवस संगीताचं काळीज चिरत होता. सासरी कुणालाच तिच्या शिक्षणाचा काही गंध नव्हता आणि त्याबद्दल काडीचंही कौतुक नव्हतं. घरातील २५-३० माणसांचा स्वैपाक, झाडलोट, धुणी-भांडी असल्या कामात संगीताचा अख्खा दिवस जाऊ लागला.

काही दिवस गेल्यावर तिने 'दवाखाना' सुरु करण्याचा मानस नवऱ्याजवळ बोलून दाखवला. पण त्यानेही काही फारसा उत्साह दाखवला नाही. उलट
स्वतः कमी शिकलेला असल्यामुळे त्याचं frustration वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडत असे. संगीताशी तो तुसडेपणानेच वागे. घरातील 'बुजुर्ग' लोक देखील तिने दवाखाना सुरु करण्याच्या विरोधातच होते. घरातील बाईने बाहेर काम करणं हे त्यांच्या 'घराण्याची इभ्रत' मातीत मिळवणारं होतं.

संगीता कशीबशी त्या घरात दिवस ढकलत होती. शिक्षण फुकट जात होतं, स्वप्नं धुळीला मिळत होती आणि त्याबद्दल आजूबाजूच्या मंडळींना काहीच वाटत नव्हतं. काही बोलावं तर उलट तिलाच सुनावलं जाई. येता-जाता टोमणे सुरूच असत. शिवाय आता तिच्यावर मुल होण्यासाठी दबाव सुरु झाला. संगीताला मेल्याहून मेल्यासारखं होत होतं. ती एकटीच आपल्या खोलीत जाऊन रडत बसे. कुणाशी बोलताही येत नव्हतं.

एके दिवशी आवरा-आवरी करताना संगीताच्या सासूला गर्भ-निरोधक गोळ्यांचं पाकीट सापडलं. आणि त्या पाकिटाने एक प्रचंड चक्रीवादळ निर्माण झालं. जोपर्यंत नवीन वातावरणाशी जुळून येत नाही, तोपर्यंत मुल होऊ द्यायचं नाही, असा संगीताचा विचार होता. मात्र त्यामुळे तिला खूप सहन करावं लागलं. सासूने तिला बेदम मारलं, तिच्यावर खूप आरडा-ओरडा केला. ती गोळ्यांची हकीकत घरभर सांगितली. तिने खूप मोठा अपराध केला होता, असे मानून सगळे तिला खूप बोलले. तिच्या माहेरी फोन लावून पण बडबड केली. आणि भर दुपारी तिला घरातून हाकलून दिलं.

अशा परिस्थितीत माहेरी परत जावं, तर दुप्पट अपमान, अवहेलना पदरी पडली असती. कुटुंबियांचे टोमणे, टोचणाऱ्या नजरा हे सगळंच सहन करावं लागलं असतं. त्यामुळे माहेरी परत नं जाण्याचा निर्णय तिने घेतला. वडिलांशी फोनवर बोलली. त्यांनी ह्यावेळीही तिला धीर दिला. ती जो निर्णय घेईल त्यात सोबत असल्याचं सांगितलं. संगीता खचली नाही. धक्क्यातून उठून उभी राहिली. दुसऱ्याच दिवशी तिने मुंबई गाठली.

संगीताची कॉलेजमधली एक जुनी मैत्रीण लग्न करून मुंबईत स्थायिक झाली होती. संगीता तिच्याकडे गेली. काही दिवस तिच्याकडे राहिली. मैत्रिणीने आणि तिच्या नवऱ्याने संगीताला समजून घेतलं, तिला आधार दिला. संगीताने खूप मेहनतीने नवीन नोकरी शोधली. रहायला भाड्याचं घर शोधलं. आणि पूर्णतः नवीन आयुष्याला सुरुवात केली. तिथून मागे वळून कधी पाहिलंच नाही.

प्रशांतशी बोलताना तिला तो भूतकाळ पुन्हा एकदा आठवला. ती कष्टी झाली. प्रशांतही हादरून गेला होता. त्याच्या कल्पांतापलीकडचं होतं हे सगळं. तो शांत बसून राहिला. संगीताही कित्येकवेळ टिपं गाळत राहिली.

संगीताचा भूतकाळ जाणल्यावर प्रशांत तिच्या अधिकच जवळच गेला. तिची जास्त काळजी घेऊ लागला. संगीतालाही त्याचा आधार वाटू लागला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला लागला. दोघं खूपवेळ एकमेकांच्या सोबतच घालवू लागले. आणि काही दिवसांनी त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

लग्न नं करताच त्या दोघांनी संसाराला सुरुवात केली. मनं जुळली असल्यामुळे कदाचित त्यांना लग्नाची गरजच भासली नसेल. शिवाय दोघांनाही जवळचं असं कुणीच नव्हतं. मग लग्न करायचं तरी कुणासाठी? आणि कशासाठी?

एकमेकांच्या साथीने दोघांनी प्रसूती-शास्त्रात खूप काम केलं. मुल नं होणाऱ्या स्त्रियांवर उपचार करून त्यांना मुल व्हावं, ह्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली, नवनवीन टेक्निक्स शिकले, खूप अभ्यास केला, परदेशी जाऊन कोर्सेस केले. आज ते दोघेही मुंबईतील प्रसिद्ध स्त्री-रोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या कार्याने त्यांनी अनेक आई-वडिलांच्या चेहेऱ्यावर हास्य पसरवलं आहे.

आज त्यांनाही एक गोंडस गोजिरी मुलगी आहे. तिघं सुखा-समाधानाचं आयुष्य जगत आहेत.

Tuesday 13 October 2015

नवदुर्गा १: शरयू


शरयू मुळची कोकणातली. दापोली तालुक्यातील आंजर्ले नावाच्या गावात ती वाढली. साधं मध्यमवर्गीय कुटुंब होतं तिचं. वडील दापोलीच्या शाळेत शिक्षक होते, आई गृहिणी. घरात आजी-आजोबा, एक अविवाहित काका, आणि शरयूची धाकटी बहिण शलाका, असे सगळे होते. खाडीच्या काठावरच टुमदार घर होतं त्यांचं. चौसोपी. घराच्या पुढ्यात अंगण, फुलझाडं, विहीर आणि घराच्या मागच्या बाजूला पोफळीची बाग. निसर्गाच्या सानिध्यात आणि अत्यंत साधेपणात शरयूचं बालपण गेलं.

शरयू लहान असल्यापासूनच अगदी तल्लख, हुशार. शाळेत नेहेमी पहिला नंबर काढत असे. त्यामुळे आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक सगळ्यांचीच लाडकी. सर्वांच्या खूप अपेक्षा होत्या तिच्याकडून. दहावी आणि बारावीत ती बोर्डात आली. आणि म्हणूनच तिला पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठवावे, असा निर्णय तिच्या आई-वडिलांनी घेतला. तिने डॉक्टर व्हावे अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती. मात्र कुणाच्याच आग्रहाला न जुमानता शरयूने 'आर्ट्स' ला जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील रुईया महाविद्यालयात तिने BA साठी प्रवेश घेतला.

मुंबईत शिक्षण घेण्यासाठी होस्टेलमध्ये राहणे अपरिहार्य होते. गावातून उठून अचानक शहरात गेलेली शरयू, तिचं कसं होईल, म्हणून आईला फार काळजी होती. आईची बालमैत्रीण मनीषा मुंबईतच राहत होती. त्यामुळे आईने मनीषाला फोन करून तिला आपल्या मुलीची काळजी घेण्याचे सांगून ठेवले. शरयूलाही मनीषा मावशीच्या रूपाने मुंबईत एक हक्काचे घर मिळाले. ती सुट्टीच्या दिवशी मनीषा मावशीच्या घरी जात असे. लवकरच ती त्यांच्या घरात छान मिसळून गेली. मनीषाची मुलं स्नेहा आणि सागरशी पण तिची मस्त गट्टी जमली.

रुईया महाविद्यालयात शरयूचं व्यक्तिमत्व सर्वांगाने फुलत गेलं. अभ्यासात तर ती पुढे होतीच. पण त्याच बरोबर निबंध-लेखन, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद ह्यातही ती चमकत होती. कॉलेजतर्फे अनेक स्पर्धांतून भाग घेऊन तिने खूप बक्षिसांची लयलूट केली. तिने मराठी साहित्य ह्या विषयात BA पूर्ण केलं. त्यावर्षीचं मराठीतील गोल्ड मेडलही तिने पटकावलं. पुढे मुंबई विद्यापीठातून तिने MA पूर्ण केलं. 

MA नंतर नक्की कुठले क्षेत्र निवडावे, ह्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. कुणी तिला पत्रकार होण्याचा सल्ला दिला, कुणी PhD करून प्राध्यापिका होण्याचा, तर कुणी निवेदिका होण्याचा. मात्र ह्यावेळीही शरयू ठाम होती. तिचे स्वप्न तिच्या वडिलांप्रमाणे शाळेत शिक्षक व्हायचे होते. पुन्हा एकदा सगळ्यांचा विरोध मोडीत काढत तिने मुंबईतच B.Ed ला प्रवेश घेतला. २ वर्षात यशस्वीपणे B.Ed पार पाडले.

शरयू B.Ed करत असतानाच तिच्या आईला शरयूच्या लग्नाचे वेध लागले. तिने स्थळं पाहायला सुरुवात केली. मनीषा मावशीच्याही कानावर घालून ठेवलं. त्याचवेळी योगायोगाने मनीषाही तिच्या मुलासाठी म्हणजेच सागरसाठी मुली पाहत होती. सागर MBBS-MD पूर्ण करून मुंबईत स्वतःची 'प्रक्टिस' करत होता. हुशार, स्मार्ट असलेल्या सागरला शरयू साजेशीच होती. त्यामुळे सागर आणि शरयूचं लग्न व्हावं, असं मनीषाच्या मनात आलं. तिने सागरला विचारलं. सागरलाही मनातून शरयू खूप आवडत होती. त्यामुळे त्याने लगेच तयारी दर्शवली.

सागराशी लग्नाचा प्रस्ताव आईने शरयूला सांगितला. शरयूलाही सागर आवडत होता. तरीही लग्नासाठी तिच्या काही अटी होत्या. तिने सागरला प्रत्यक्ष भेटून त्याच्याशी बोलण्याचं ठरवलं.

ठरल्याप्रमाणे दोघं CCD मध्ये भेटले. आणि गरम कॉफीचे घुटके घेत भविष्याविषयी बोलू लागले. शरयूने सागरला होकार दिला. म्हणजेच तिला तो आवडतो, त्याच्याशी लग्न करण्याची तयारी आहे, असं सांगितलं. मात्र त्या होकारापुढे एक जटील "अट" घालून ठेवली. ती म्हणाली,
"तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर घरजावई म्हणून आमच्या आंजर्ल्याच्या घरी येउन राहावं लागेल. तसं झालं तरच मी तुझ्याशी लग्न करेन. मला तिथल्या शाळेत नोकरी मिळाली आहे. आणि मी काही दिवसातच परत गावी जाऊन शाळेत रुजू होणार आहे."

सागरने आणि इतर सर्वांनीच तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. सागरची मेडिकल प्रक्टिस मुंबईत होती. त्याचा आता चांगला जम बसला होता. ती सोडून त्याने गावाला जाणं शक्य नव्हतं. शिवाय तो लहानपणीपासून मुंबईत राहिलेला, त्याला गावाची काहीच ओढ नव्हती. ह्याउलट शरयू गेली अनेक वर्ष मुंबईत राहिलेली. तिला शिक्षणाच्या जोरावर मुंबईत सहज नोकरीही मिळाली असती. तरीही तिला गावाला का जायचं होतं, हे कुणालाच कळत नव्हतं. 

शरयू तशी लहानपणीपासूनच हट्टी. तिने आत्तापर्यंतचे सगळे निर्णय स्वतः घेतले. सर्वांचा विरोध झुगारून देऊन घेतले. तसेच ती ह्यावेळीही वागली. कुणाचेच ऐकले नाही. सागरच्या समजावण्याचाही तिच्यावर काही परिणाम झाला नाही. तिने फार वाद नाही घातला. पण त्याला एक पत्र लिहून स्वतःची भूमिका तिने मांडली.

गावात शिक्षिका होण्याचं तिचं लहानपणी पासूनचं स्वप्न होतं. आंजर्ला गावी ७वी पर्यंतचीच शाळा होती. त्यापुढील शिक्षण घ्यायला मुलांना रोज तालुक्याला जावं लागे. जी शाळा होती, तिची अवस्थाही फारशी चांगली नव्हती. त्यामुळे उच्चशिक्षण घेऊन परत ह्याच शाळेत नोकरीला यायचं, आणि येथील शिक्षणाचा दर्जा सुधारायचा, असं तिने मनोमन ठरवलं होतं.

लवकरच शरयू गावी परतली. गावाच्या वातावरणाशी परत जुळवून घ्यायला तिला वेळ लागला नाही. कारण गावचे प्रेम, ओढ तिच्या मनात कायमच होती. गावातील शाळेत ती रुजू झाली. मन लावून मुलांना शिकवू लागली. स्वप्नपूर्तीच्या आनंदाने तिला अधिकच हुरूप येऊ लागला. ती लवकरच विद्यार्थीप्रिय शिक्षिका झाली. मुलांना तिच्या विषयात रुची वाटायला लागली. शाळेच्या वाचनालयाचं काम तिने हाती घेतलं. स्वतःची अनेक पुस्तकं देऊ केली, इतरांकडूनही पुस्तकरूपी देणगी मागायला सुरुवात केली. लवकरच एक सुसज्ज वाचनालय तयार केलं. मुलांना वाचनाची गोडी लावली. 

शरयू आपल्या कामात इतकी दंग झाली, की दुसरा कुठलाही विषय तिच्या मनात येत नसे. इथे सागरची मात्र झोप उडाली होती. शरयूचा विचार त्याच्या मनातून जात नव्हता. मन दोलायमान होत होतं. पण शेवटी शरयूच्या प्रेमाने त्याच्या  मनावर विजय मिळवलाच. एके रात्री २ वाजता तो उठला, आणि त्याने त्याचा 'तो' निर्णय आईला सांगितला..!!! 

गावच्या घराच्या अंगणातच मांडव घालून दोघांचा छोटेखानी विवाह सोहळा पार पडला. आणि सागरने 'घरजावई' म्हणून गृह-प्रवेश केला.

शरयूचे स्वप्न आणि तिला मिळालेली सागरची साथ ह्याचा सुरेख मिलाप झाला. सागरचा दवाखाना गावात तेजीत चालू लागला. त्याची कीर्ती ऐकून पंचक्रोशीतून लोक त्याच्याकडे येऊ लागले. शाळेची प्रगतीही जोरात सुरु होती. काही वर्षातच गावात माध्यमिक शाळाही सुरु झाली.

दोघांनी मिळून घेतलेला 'तो' निर्णय, गावात केलेलं 'ते' अविरत कार्य, आणि त्यातून पूर्ण होत गेलेलं 'ती'चं स्वप्न.. सगळंच असामान्य.

सामन्यातील 'ती'च्या असामान्यत्वाला सलाम..!!!


Monday 14 April 2014

जशोदाबेन

सध्या सार्वत्रिक निवडणुकांचे दिवस सुरु आहेत. वृत्तवाहिन्यांचे कार्यक्रम आणि वृत्तपत्रांचे रकाने निवडणुकीच्या बातम्यांनी भरभरून येत आहेत. हल्ली काही राजकारण्यांनी राजकारणाची पातळी अतिशय खाली आणून ठेवली आहे. अशा राजकारण्यांनी सैनिकांच्या साहसाची गटबाजी केली, निघ्रूण बलात्काऱ्यांच्या बाजूने गळेही काढले. नेतेमंडळीना तर हल्ली एकमेकांवर अश्लाघ्य चिखलफेक करण्यातच धन्यता वाटत असते; आणि वृत्तवाहिन्यांना ही सगळी चिखलफेक परतपरत उगाळत बसण्यात! अशा परिस्थितीत संवेदनशील व्यक्ती काही भाष्य करूच शकत नाही. सुन्न होऊन बघत बसण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.

तशीच सुन्न-शांत बसून होते. काही बोला-लिहायचीही इच्छा होत नव्हती. पण "ती"ची व्यथा ऐकली. आणि हा संयमाचा बांध फुटला. बोलावं, लिहावं अगदी आक्रस्ताळेपणाने ओरडावं वाटू लागलं. "ती"च्या बाजूने उभं राहावं, सर्वांसमोर जाऊन "ती"ची बाजू मांडवी, असं वाटू लागलं. 

तसं पाहता "ती" अगदी सामन्यांतलीच एक. खेडेगावात, गरीब घरात जन्मलेली. जुन्या वळणाच्या कुटुंबात वाढलेली. ७वी पर्यंत जेमतेम शिक्षण पार केलं, तेव्हाच वडिलांनी "ती"चं लग्न लावून दिलं. अगदी लग्न म्हणजे काय हे कळायच्या आधी "ती" सासरी नांदायला गेली सुद्धा. नवऱ्याशी काही जवळीक होण्याची शक्यताच नव्हती. कारण नवऱ्याच्या मनात राष्ट्रप्रेमाचेच वारे वाहत होते. भारतमातेच्या चरणी लीन होऊ इच्छिणाऱ्या 'त्या'च्या साठी लग्न, बंधन, पत्नी ह्या दुरापास्त गोष्टी होत्या. त्यात अडकून न पडता त्याने त्याचा मार्ग निवडला. तो निघून गेला, तो परत मागे वळून पाहण्यासाठी नाहीच.

जाताजाता "ती"ला एकच संदेश देऊन गेला, 'वडिलांकडे जाऊन तुझे राहिलेले शिक्षण पूर्ण कर'. "ती" देखील नवऱ्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊ लागली. शिकली-सवरली. शाळेत लहान मुलांना शिकवू लागली. भावांच्या आश्रयाला राहिलेल्या "ती"ने परत दुसऱ्या लग्नाचा कधी विचारच केला नाही. शाळेतील मुलांच्या शिक्षणातच स्वतःला झोकून दिलं. रोज शाळेची नोकरी, दैनंदिन घरकाम, पूजापाठ यातच "ती"ने संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. संपूर्ण एकटेपणाचा प्रवास! आपला निघून गेलेला नवरा परत कधीही आपल्या जवळ येणार नाही, आपल्याशी कुठला संपर्कही करणार नाही, याची "ती"ला मनोमन कल्पना होती. "ती"ने तशी आशा देखील कधी बाळगली नाही.

"ती"चा नवरा कैक वर्ष संघ-प्रचारक म्हणून भारतभर फिरला. आतोनात श्रम केले. समाजाचे, राष्ट्राचे कल्याण करण्यासाठी झटला. पुढे राजकारणात सक्रिय झाला. एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि त्या राज्यात केलेल्या कल्याणकारी कार्यामुळे देशभर प्रसिद्धीस आला. आणि आता 'तो'च भारताचा पंतप्रधान होण्याच्या जवळ पोहोचला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रवासात 'त्या'ला कधीही बायकोची आठवण आली नाही. पण 'त्या'ची उणीदुणी काढणाऱ्या 'त्या'च्या विरोधकांना मात्र "ती"ची आठवण आली. आणि मग "ती"च्या अस्तित्वाचा शोध घेण्याची कुत्सित चढाओढ विरोधक आणि वृत्तसंस्था यांच्यात लागली. 'त्या'ने "ती"ला कसे त्यागले, "ती"ची कशी अवहेलना झाली, "ती"ने कसे एकटेपणात, हलाखीत आयुष्य व्यतीत केले, अशा कथांना उधाण आले. एवढेच नाही, तर "ते" दोघे किती दिवस एकत्र राहिले, त्यांच्यातील संबंध कसे होते, त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते का, त्यांचे एकमेकांशी बोलणे होते का, असे अतिशय 'वैयक्तिक' प्रश्न देखील चव्हाट्यावर आणले जाऊ लागले.

गलिच्छ, दूषित राजकारणी हेतूने असे प्रश्न चव्हाट्यावर आणणाऱ्या त्या सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे. "ती"च्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका. एक परित्यक्ता म्हणून "ती"च्या हक्कासाठी गळे काढणार्यांनो, हे सरळसरळ "ती"च्या  मानवाधिकारांचे हनन आहे. एकटेपणात आणि कष्टात आयुष्य व्यतीत केलेल्या "ती"ची लक्तरे करून अशी चव्हाट्यावर टांगू नका. त्यातून तुमचे 'राजकारणी हित' साधेल की नाही माहित नाही, पण त्यात "ती" आणि "ती"चे कुटुंब मात्र पार उद्धस्त होईल. "ती"च्या पुढील आयुष्यासाठी एवढे करणे टाळा. कृपा होईल!


[ महत्त्वाचे:-
१) मुळात श्री. नरेंद्र मोदी आणि श्रीमती जशोदाबेन ह्यांचा विवाह ते दोघेही लहान (घटनेनुसार १८ वर्षाखालील मुलांना 'minor' म्हटले जाते) असताना झाला. त्यामुळे त्या विवाहाला कुठलाही कायदेशीर आधार नाही...
२)  तसेच श्री. नरेंद्र मोदी आणि श्रीमती जशोदाबेन लग्नानंतर फारच कमी काळ (केवळ ३ महिने) एकत्र राहिले. त्यामुळे असा विवाह कायद्याने सहजरित्या रद्दबातल ठरवला जाऊ शकतो... ]


Tuesday 3 December 2013

सुश्मिता



मला आजही तो दिवस खूप छान आठवतो. JNU मधील आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी सुश्मिताच्या पार्टीला गेलो होतो. आमच्या वर्गाची प्रथाच होती अशी. कुणाच्याही आयुष्यातला कुठलाही आनंदाचा क्षण आम्ही ११ जण मिळून एकत्र साजरा करत असु. मग कुणाचा वाढदिवस, कुणाचा साखरपुडा, कुणाची एखादी परीक्षा पास झाल्याची पार्टी, एवढेच नाही तर कुणाच्या घरात कुणाला भाचा, पुतण्या वगरे झाला अशा अनेक प्रसंगी आम्ही ११ जणांनी पार्टी केली होती. पण ह्या पार्टीला विशेष महत्त्व होतं. आमच्या ग्रुप मधील सुश्मिताला आमच्यामध्ये सगळ्यात पहिली नोकरी लागली होती. तिच्या त्या आनंदात सहभागी होताना मलाही अतिशय आनंद होत होता.

खरं सांगायचं तर सुश्मिता जेव्हा आमच्या वर्गात M.Phil करण्यासाठी दाखल झाली, तेव्हाच हे निश्चित झालं की ती लवकरात लवकर खूप चांगली नोकरी मिळवणार. आम्ही सगळे JNU मध्ये वेगवेगळ्या उद्देशाने आलो होतो. कुणाला राजकारणात सक्रिय व्हायचं होतं, कुणाला शुद्ध संशोधन करायचं होतं, कुणाला IAS च्या परीक्षेची तयारी करायची होती. पण सुश्मिता मात्र विद्यापीठात शिक्षिकेची नोकरी मिळवण्याच्या उद्देशानेच JNU मध्ये आली. मी आयुष्यात फार कमी व्यक्ती अशा पाहिल्या आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्याकडून काय हवं ते निश्चित माहित असतं. बाकी सगळे भटकत असतात. वाट शोधत असतात. सुश्मिताला तिची वाट नक्की माहित होती. तिच्या त्या वाटेवर JNU हा केवळ एक थांबा होता. त्याच थांब्यावर ती पळभर विसावली तेव्हाच आमची मैत्री झाली. 

सुश्मिता मुळात बंगाली होती. पण तिच्या काही पिढ्या ओडिशा मध्ये स्थायिक झाल्या असल्यामुळे तिच्या कुटुंबाची ओळख ओडियाच आहे. सुश्मितालाही स्वताला बंगाली म्हणण्यापेक्षा ओडिया म्हटलेले अधिक आवडते. मागासवर्गीय घरात जन्मलेल्या सुश्मिताने जन्मापासून गरिबीच पाहिली आहे. तिचे आई-वडील दोघेही शेतमजुरी करतात. त्यात मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनावर आपल्या तीन मुलांची तोंडं भरताना अक्षरशः त्यांचे नाकी नऊ येतात. त्यात सगळ्यात मोठी असल्याच्या नात्याने सुश्मिताने सतत तडजोडच केली आहे. लहानपणी स्वतः दोन घास कमी खाऊन धाकट्या लाडक्या भावांना भरवले आहेत.

शिष्यवृत्तीच्या सहाय्याने  आजवर सुश्मिता एवढे शिक्षण घेऊ शकली, हे जरी खरे असले तरी त्याचे अशा प्रकारे चीज करणे सगळ्यांनाच जमत नाही. आजपर्यंत मिळालेल्या शिष्यवृत्त्या, बक्षीसे ह्यातून सुश्मिताने पुस्तकांखेरीज काहीच घेतले नाही. सुश्मिताला ज्ञानाची भूक आहे.  त्यानेच तिचे पोट भरते. उत्कल विद्यापीठातून ओडिया माध्यमातून तिने MA पूर्ण केलं आणि M.Phil करण्यासाठी JNU मध्ये दाखल झाली. आमच्या वर्गामध्ये इंग्लिश कच्चं असलेली ती एकमेव विद्यार्थिनी होती. पण रोज पहाटे ५ वाजता उठून इंग्लिशची उजळणी करताना मी तिला पाहिले आहे. त्यामुळेच JNU मध्ये आल्यापासून सहा महिन्यातच ती correct इंग्लिश बोलायला लागली.

सुश्मिताचं आतापर्यंतचं आयुष्य कितीही खडतर राहिलं असलं तरी त्या आयुष्याने तिला खचवून न टाकता उलट आशावादी केले आहे, तिला जीवनाबद्दलचा एक सकारात्मक दृष्टीकोन दिला आहे. मी तिला आजवर कधीही रडताना पहिलेले नाही, की कुणावर उगीचच राग राग करताना पाहिलेले नाही. तिच्या नावाप्रमाणे तिच्या चेहेऱ्यावर सतत हसू तरळत असतं. तिच्या मोहक डोळ्यातून भूतकाळाचे अश्रू नाही तर भविष्याची स्वप्नं डोकावत असतात. 

सुश्मिता बद्दलच्या काही गोष्टी मला खूपच भावतात. होस्टेल मध्ये माझी आणि तिची खोली अगदी जवळ जवळ होती. होस्टेल मधील इतर मुलींप्रमाणे मी देखील उशिरा (म्हणजे फार नाही.. ८ वाजता..) उठत असे. पण मी जेव्हा उठायचे तेव्हा सुश्मिता अभ्यासात गर्क असे. ती भल्या पहाटेच उठायची. उठून सगळ्यात आधी स्वताची खोली झाडून-पुसून स्वच्छ करायची. मग आंघोळ इत्यादी आवरून खोलीतल्या छोट्याश्या देवघरात दिवा लावायची. आणि त्यानंतर अभ्यासाला बसायची. मी तिला breakfast साठी हाक मारायचे तेव्हा तिचा अभ्यासाचा एक अध्याय पूर्ण करून ती उठलेली असायची. हा पहाटेचा अभ्यास ती रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी चुकवायची नाही. तिला एकूणच अभ्यासाचा कंटाळाच नव्हता. तिला जे यश मिळवायचे होते त्यासाठी कितीही मेहनत घेण्याची तिची तयारी होती. 

सुश्मिताची खोली अगदी स्वच्छ, टापटीप असे. होस्टेल मधल्या इतर खोल्यांसारखी मुळीच नाही. कुठे कपडे फेकलेले नाहीत, कुठे वस्तू पडलेल्या नाहीत. पुस्तके आणि अभ्यासाचे साहित्यही व्यवस्थित ठेवलेले असायचे. सुश्मिताला अभ्यासाव्यतिरिक्त अजून एक आवड होती, ती म्हणजे स्वैपाकाची. तिच्या खोलीत एक छोटीशी induction प्लेट होती. त्यावर ती वेगवेगळे पदार्थ बनवायची. मला बोलावून बोलावून खाऊ घालायची. मी तिला चेष्टेने म्हणायचेही, "छान जोडी आहे आपली, तुला बनवायची आवड आणि मला खाण्याची.." पण खरोखर सुश्मिताच्या हाताला विलक्षण चव होती. तिने केलेली साधी maggi सुद्धा चमचमीत लागायची. खूप खाऊ घातलं मला सुश्मिताने. आणि खूप काही शिकवलंही. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन तिने शिकवला, स्वप्नं पाहणं शिकवलं, आणि त्या स्वप्नांचा पाठपुरावा करणंही शिकवलं..!

सुश्मिताचा तिच्या लहान भावांवर विलक्षण जीव होता. त्यांची खरी नावं मला माहित नाहीत. ती त्या दोघांचा उल्लेख सोनू आणि चिंटू असा करायची. त्यातील सोनू त्यावेळी १२वीत होता आणि चिंटू शाळेत होता. scholarship मिळायला लागल्यापासून त्या दोघांच्या शिक्षणासाठी तीच पैसे पाठवू लागली. स्वतः ती ४-५ ड्रेस वर वर्ष काढायची पण भावांच्या शिक्षणात काही कमी पडू नये ह्यासाठी झटायची. घरच्यांशी रोज बोलता यावं म्हणून तिनेच आईला मोबाईल घेऊन दिला होता. रोज अर्धा अर्धा तास घरच्यांशी गप्पा मारायची. ती ओडिया मध्ये काय बोलायची मला फारसे कळायचे नाही, पण बहुतेकदा भावांना अभ्यास करण्याविषयी बजावत असे. भाऊ पण तिला खूप मानायचे.

एकदा सुश्मिताने आई आणि भावांना ४ दिवस दिल्ली फिरवायला आणले होते. आई सुश्मिताच्या होस्टेलच्या खोलीत राहिली होती आणि सोनू आणि चिंटू boys होस्टेल मध्ये आमच्या मित्राच्या खोलीत राहिले होते. त्यांना सुश्मिताने (आणि बरोबर मी) अगदी गाडी करून फिरवले. लाल किल्ला, लोटस टेम्पल, कुतुब मिनार सगळे दाखवले. अगदी छान हॉटेलमध्ये खाऊ घातले. त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहून माझे डोळे पाणावले होते. आयुष्यात स्वतःच्या गावाबाहेरही न पडलेले ते भाऊ सगळीकडे कुतूहलाने पाहत होते. ज्यांच्या पानात २ वेळेच्या भाताच्या पेजेशिवाय काही पडले नाही, त्या दोघा भावांनी ते मनचुरिअन, चाउमीन, इ. चाटूनपुसून खाल्ले. आयुष्यभर हालाखीत राहिलेल्या त्या माउलीने मुलांची हौस म्हणून स्वतःलाही सगळ्यात सहभागी करून घेतले. आणि आपल्या कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवण्याची स्वप्न पाहणाऱ्या सुश्मिताला ते दिवस जवळ येत आहेत असे वाटू लागले..! 

आज सुश्मिता उत्कल विद्यापीठात राज्यशास्त्राची प्राध्यापिका झाली आहे. विद्यापीठाच्या ठिकाणी एकटी घर घेऊन राहत आहे. स्वतःचे घर, स्वतःचे जेवण-खाण एकटी सांभाळते. रोजचा डबा तयार करून कॉलेजला जाते आणि वर्गात ८ च्या लेक्चरला उभी राहते. संध्याकाळी घरी आली की दुसऱ्या दिवशीच्या लेक्चरची तयारी करते. खूप मन लावून शिकवते ती मुलांना. ती विद्यार्थी-प्रिय शिक्षिका असेलच, ह्यात मला शंका वाटत नाही. तिच्या कृपेने आज तिचा सोनू कोलकाता येथे इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. आणि चिंटू १२वीचा अभ्यास करत आहे.

सुश्मिताने पाहिलेली सगळी स्वप्नं पूर्ण होऊ लागली आहेत आणि तिच्या चेहेऱ्यावरचे सु'स्मित' अजूनही तसेच खळखळत आहे..!